मुंबई : गेल्या काही तासांपासून मुंबई (Mumbai)आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. कालपासूनच मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळी दहा वाजल्यापासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. तेव्हापासून गेले तास-दीड तास उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने जराही उसंत घेतलेली नाही. (Rain)त्यामुळे सध्या उपनगरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी तुंबायला सुरुवात झाली आहे. यामुळे रस्ते वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.
अंधेरी सबवे परिसरात तीन ते चार फुटापर्यंत पानी, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम
पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.(Mumbai) सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद केली आहे. अंधेरी परिसरात काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरही परिणाम होताना दिसत आहे. जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य रेल्वेला पावसाचा फटका, वाहतूक विस्कळीत!
मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली असून, त्यांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वाहतूक व्यवस्थेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी घोषणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार
दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. काजळी नदी पात्राबाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे.
कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प
गेले दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. या पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातल्या कशेडी घाटाला बसतोय. कशेडी घाटातील बोगदाजवळ दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पडलेली दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासनातून कडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसातून ही दरड बाजूला करण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत.