मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेकडून यासंदर्भातील अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुंबईत पुढचे तीन दिवस उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत छोट्या होड्यांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रायगड, रत्नागिरी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं मुंबई वेधशाळेनं म्हटलं आहे. तसेच सातारा आणि पुणे घाट परिसराला पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. याचबरोबर भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्राने (INCOIS) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आजपासून ३१ जुलै रात्री ८:३० पर्यंत ३.७ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिला आहे.
या काळात लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. समुद्रकिनारी उंच लाटांचे तडाखे बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. प्रशासनाने या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल (SDRF) यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील भीमा नदीला दौंड पुलाजवळ ५०,११९ क्युसेक विसर्ग झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून २४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.