बीड : बीड दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde ) यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आपल्या उत्साही कार्यकर्त्यांना 'सुधरा' या शब्दात संयमाचा सल्ला दिला.
मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Beed) बैठक घेतली. बैठक संपवून त्या निघत असताना कार्यालयाच्या परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्काराची तयारी केली होती. मुंडे यांनी अगोदर तर सत्कार घ्यायला नका दिला. 'तुम्ही माझे किती वेळा सत्कार करणार?' असा सवाल पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडेंनी सत्कार स्वीकारला, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी 'ताई तुम्हीच आमच्या पालकमंत्री' असे म्हणायला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना करड्या आवाजात सुनावले. 'आपले पालकमंत्री अजितदादा आहेत. हे लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. मी संपर्क मंत्री आहे' असे सांगितले. यावरही काहींनी 'आमच्यासाठी पालकमंत्री तुम्हीच' असे म्हटल्यानंतर मंत्री पकंजा मुंडेंनी या उत्साही कार्यकर्त्यांना 'अरे सुधरा रे' असे सांगत संयमाचा सल्ला दिला.