पाथर्डी दि.२ (प्रतिनिधी)- मी कधीही कोणत्याच आरोपीची पाठराखण केलेली नाही, करणार देखील नाही, उलटपक्षी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील. आरोपीना फाशी व्हावी हीच आपली भूमिका आहे असे मत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख कुटुंबाने (दि.२) रविवार रोजी शास्त्री यांची भेट घेतली.
दरम्यान आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबिय गडावर पोहचले. त्यांनी महंतांची भेट घेतली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा गच्चा महाराजांपुढे मांडला. आरोपींच्या गुन्ह्याचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला. धनंजय देशमुख यांची आर्त हाक नामदेव शास्त्री यांनी ऐकली. त्यांनी लागलीच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.