महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही. त्यामुळे काही नेत्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री (Radhakrishna Vikhepatil) राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू आणि खडी क्रशरबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत”, असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhepatil)पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा रंगली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
“आधीच्या काळात शनिवारी एक चित्रपट लागायचा. तेव्हा चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. मी १९७५ ला मॅट्रीक पास झालो. तेव्हा चित्रपट पाहण्याचा वेगळा आनंद असायचा. आता चित्रपट पाहण्यासाठी कोणी मांडी घालून बसणार का? आता तंत्रज्ञान बदललं आहे. खरं तर आपण एखाद्या दिवशी आनंदाच्या विश्वात गेलं पाहिजे. अन्यथा दररोज तेच-तेच हा गेला, तो आला. अन्यथा वाळूच्या ट्रक पकडल्या असं ऐकावं लागतं. आपली जिल्हा परिषद आहे त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूच्या ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. सोलापूर यासाठी फार प्रसिद्ध आहे. मी मागे एकदा त्यांना (जिल्हाधिकाऱ्यांना) म्हटलं होतं की, दुर्लक्ष करा थोडसं. गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत”, असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.