खासबात/ संजय मालाणी
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हयात प्रचंड जनक्षोभ असणे साहजिक आहे. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही कारणासाठी मारुण टाकणे हे सामान्य जनमाणसाला कधीच पटणारे, पचणारे नसते, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी सत्ता पक्षातील आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी केली, यात काही आरोपी अटक झाले, आणखी काही अटक होतील, कायदा कायद्याचे काम करील, या घटनेच्या माध्यमातून काही लोक ज्यांची त्यांची राजकीय गणितं मांडतील पण या पलीकडे जाऊन बीड जिल्ह्यावर अशी वेळ का आली आहे? हे अपयश कोणाचे आहे याचा विचार केला जाणार आहे का नाही?
अगदी दोन तीन दशके मागे जाईपर्यंत बीड जिल्ह्याची ओळख गुन्हेगारी जिल्हा अशी कधीच नव्हती. बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जायचे, ती ओळख विकासाच्या फुटपट्टीत भलेही भूषणावह नव्हती पण सामान्यांची मान खाली जावी अशीही नव्हती. राजकीय, सामाजिक सलोखा जपणारा जिल्हा अशी बीडची ओळख होती. गावखेडयापासून शहरापर्यंत व्यापार, उद्योग करणाऱ्या व्यक्तीच्या जातीचे त्या गावात किंवा शहरात मुठभर लोक असले तरी त्या व्यापाऱ्याला त्या गावात किंवा शहरात असुरक्षित वाटत नव्हते, ही सुरक्षा सामाजिक आणि राजकीय नेत्यांनिच दिलेली होती. गुंड, गुन्हेगारी प्रवृत्ती बीडच काय सगळीकडेच नेहमीच असते, पण गुंडांचा त्या त्या परिस्थितीत राजकारणासाठी वापर झाला तरी गुंडांना राजाश्रय आणि त्यांना राजकीय महत्व दिले जात नव्हते. गुंड आणि झुंडीच्या मानसिकतेला दिवसा उजेडी उजळमाथ्याने भेटायला सारेच नेते टाळायचे, पण नंतरच्या काळात राजकारणात गुंडांचे महत्व वाढले , गुन्हेगारांना राजकीय संघटनेत पदे मिळायला लागली, राजकारणात स्थिरवण्याचा मार्ग गुन्हेगारीमधून, गुंडगिरीमधून जातो असे तरुणाईच्या मनात पक्के बसले त्याची जबाबदारी कोणाची? एक व्यक्ती गुंडांचा राजकारणासाठी वापर करतो म्हणून दुसर्याने करायचा , दुसरा करतो म्हणून तिसऱ्याने करायचा यातून आता राजकीय कार्यकर्ता म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारांचे महत्व वाढले, मग त्यांचे लाड पुरविण्याची जबाबदारी अर्थातच राजकीय नेत्यांवर आली, त्यासाठी मग त्यांनी काहीही केले तरी त्यांची पाठराखण करायची ही मानसिकता वाढीस लागली. जिल्ह्यात बहुतांश नेत्यांनी याच मानसिकतेला खतपाणी घातले आहे, याला काही सन्माननीय अपवाद आहेत, नाहीत असे नाही पण बहुतांश ठिकाणची परिस्थिती गुंडांना महत्व देणारीच आहे.
गावागावात पूर्वी राजकीय कार्यकर्त्यांना महत्व असायचे, गावचा सरपंच, ग्रामपोणलयात सदस्य, शहरातला नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या सदस्य हे पक्षासाठी , नेत्यासाठी जीव तोडून काम करायचे, त्यांना मग आमदार , खासदारांचा निधी असेल किंवा इतर योजनांच्या निधीतून कामे दिली जायची, आता एखाद्या गावात काम निघाले तर तेथील राजकीय कार्यकर्त्याच्या जोडीने नेत्यासाठी झटणाऱ्या गुंड कार्यकर्त्याला देखील कुठे ३० टक्क्यात तर कुठे ५० टक्क्यात 'अड्जस्ट ' करायला सांगितले जाते , मग राजकारणात गावपातळीवर काम करण्यापेक्षा चार चाकूचे घेऊन गुंडगिरी केलेली बरी असे सामान्यांना वाटले तर त्यात नेमके चुकले कोणाचे ? यातूनच मग काही तरी नाव करायचंय म्हणजे दादागिरी, गुंडगिरी करायची अशी मानसिकता वाढली आहे. आणि याला सारेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत.
प्रशासन, पोलीस यांच्यातही अशाच लोकांचा दबदबा, त्यांच्यासाठी नेते फोन करणार , मग अशा मानसिकतेचे लोक ना पोलिसांना जुमानता, ना प्रशासनाला . बरेपोलिसांकडे जाण्याऐवजी गल्लीतल्या दादाकडे गेल्यावर 'न्याय ' लवकर मिळतो अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर 'दादा ' होण्याची क्रेझ सामन्यांमध्ये वाढणारच ना , हे अपयश नेमके कोणाचे ? प्रशासनात सामान्यांचे काहीच चालत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण ? मलईदार टेबल, पोस्ट मिळविण्यासाठी राजकारण्यांचे उंब्रे झिजवायचे आणि मग ती पोस्ट टिकून राहावी यासाठी राजकारण्यांचे होयबा होऊन राहायचे, राजकीय नेत्याचा आशीर्वाद असेल तर आपण कितीही 'काळे ' धंदे केली तरी आपले काहीच बिघडत नाही, हा निर्ढावलेपणा जो प्रशासनात आला, त्यातूनही प्रशासन सामान्यांचे, सामान्यांसाठी न राहता मूठभर लोकांच्या हातचे बाहुले झाले, मग झुंडशाही वाढेल नाही तर काय होईल ?
कोणा एका व्यक्तीला, कोणा एका पक्षाला, कोण एका नेत्याला दोष देऊन हे चित्र बदलणार नाही, कोणताच घटक आपल्या मर्यादा ओळखायला आणि त्या मर्यादांमध्ये राहायला तयार नाही, मग सामान्य जनतेचाही तसेच, त्यांना देखील दादागिरी जो पर्यंत इतरांवर असते तो पर्यंत आवडते , 'आमच्या नेत्याने अशा काही शिव्या दिल्या त्या धिकाऱ्याला , की काय विचारता ? ' अशी वाक्ये जर अभिमानाने घेतली जात असतील, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जनताच राजकारणातील पदांवर बसवंत असेल, तर उद्या कोणत्याही घरातील घरातील तरुणाला गुन्हेगारीचे, दादागिरीचे, झुंडशाहीचे आकर्षण वाटणारच आणि समाजचीच तशी मानसिकता बनत गेल्यावर , त्यावरच मतांचे राजकारण अवलंबून राहायला लागले तर राजकीय नेते तरी यापेक्षा वेगळी वाट शोधतील कशाला ? या साऱ्या परिस्थितीचा विचार करणे आज आवश्यक आहे. यात कोणत्याही एका राजकीय व्यक्तीला , पक्षाला दोष देऊन भागणार नाही, कोणी कमी असेल तर कोणी जास्त, पण या परिस्थितीला जबाबदार सारेच आहेत.