Advertisement

संपादकीय-भय इथले संपत नाही

प्रजापत्र | Saturday, 25/10/2025
बातमी शेअर करा

राज्यात महिलांवरील अत्याचार हा विषय सातारा डॉक्टर प्रकरणाने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.महिलांवरील अत्याचार आता कोणत्या वर्ग किंवा वर्ण समूहापुरते राहिलेले नसून अगदी डॉक्टर महिलेला देखील अत्याचाराला सामोरे जावे लागून जीवन संपवावे लागते आणि त्यातील आरोपी एक पोलीस अधिकारी असतो यातच कायदा,व्यवस्था,समाज या साऱ्यांचाच धाक कसा शिल्लकच राहिलेला नाही हे स्पष्ट होते.विशेष म्हणजे राज्याचा कोणताच भाग गुन्हेगारीपासून बाजूला राहिलेला नाही हे देखील यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एखाद्या जिल्ह्याला बदनाम जाणाऱ्या मानसिकतेला राज्यात सर्वत्र असलेली 'भय इथले संपत नाही ' ची परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.
---
मागच्या काही काळात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अशा अत्याचाराच्या प्रकरणात पांढरपेशे म्हणून मिरविणारे किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यवस्थेवर 'प्रभाव' असणारे लोक आरोपी म्हणून समोर येतात ही शोकांतिका आहे. गुन्हेगारी कोणाचीही वाईटच, मात्र ज्यावेळी गुन्हेगारीमध्ये गुंतलेले हात प्रभावशाली असतात,त्यावेळी सारी व्यवस्था कशी त्या प्रभावाच्या अंमलाखाली येत असते हे सातारा प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे व्यवस्थेचे असे प्रभावित होणे हे कोणत्या एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर अशी प्रभावात येण्याची सवय संपूर्ण राज्यभर किंबहुना देशभर आहे हे सत्य देखील सातारा प्रकरणाने पुन्हा अधोरेखित केले आहे.
मुळात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने होत असताना,एखादा पोलीस अधिकारी ज्यावेळी अशा एखाद्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर येतो,त्यावेळी अशा प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढत असते.पोलिसांची समाजमनातील प्रतिमा ही कायद्याचा रक्षक अशी आहे. ही प्रतिमा काही एका दिवसात तयार झालेली नाही, तर पोलिसांच्या अनेक पिढ्या यासाठी झटल्या आहेत. मात्र मागच्या काही वर्षात या प्रतिमेला धक्का लागण्याचे प्रकार वारंवार आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात घडत आलेले आहेत.असे एखादे प्रकरण घडले की काही काळ चर्चा होते, मात्र नंतर सारे काही विसरले जाते असाच अनुभव असल्याने अशा साऱ्या प्रकारांचे ना पोलीस खात्यातील वरिष्ठांना काही वाटते ना इतर समाजघटकांना. महिलांसोबत असभ्य वर्तन करण्याचे आरोप म्हणा किंवा गुन्हे म्हणा,दाखल असतील आणि त्यावर कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलीस खाते 'शीतल'च राहणार असेल तर मग अशा घटनांना आवार घालायचा तरी कसा आणि कोणी ? सातारा प्रकरणाने असे प्रश्न पुन्हा समाजासमोर आणले आहेत.यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडण्यात आल्याच्या, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याच्या पत्नीनेच त्याला परस्त्रीसोबत पकडून चोप दिल्याच्या किंवा पोलीस कर्मचाऱ्याने थेट आपल्या अधिकाऱ्यावर आरोप केल्याच्या घटना राज्याच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या आहेत.खरेतर ज्यावेळी रक्षक म्हणवणारांवर असे काही आरोप होतात,त्यावेळी पोलीस खात्याने देखील त्या प्रकारांकडे गांभीर्याने आणि व्यावसायिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून देखील पहिले पाहिजे आणि त्या त्या वेळी कठोर संदेश दिले पाहिजेत, पण व्यवस्थेकडून तसे काही केले जात नाही आणि त्यातूनच मग कोणाला तरी जीव गमवावा लागतो.पोलीस खाते आणि एकूणच समाजव्यवस्थेने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
सातारा प्रकरणाला केवळ एकच अंग नाही तर या प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत. मयत महिला डॉक्टरवर शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी आणि खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी देखील दबाव आणला जात होता हे देखील समोर आले आहे. हे दबाव आणणारे कोण आहेत हे यथावकाश समोर येईल किंवा कधीच समोर येणारही नाही, मात्र त्या महिला डॉक्टरने या प्रकारची कल्पना आपल्या वरिष्ठांना दिली होती, काही प्रकरणात तक्रार देण्याचा देखील प्रयत्न केला होता, त्या तक्रारींची वेळीच दखल का घेतली गेली नाही? महिलांच्या तक्रारी बेदखल करणारी व्यवस्था नेमकी का पोसली जात आहे, आणि राज्याच्या सर्वच भागांमध्ये असे होत असेल तर याची नैतिक जबाबदारी शेवटी कोणाची ? जोपर्यंत प्रभावात आणि दबावात येणारी व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत असेच अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागणार आहे, तोपर्यंत इथले भय संपणार नाहीच.केवळ कोणावर टीका करून, कोणाला दोष देऊन,एखाद्या भागाला,एखाद्या समूहाला बदनाम करून राजकारण करता येईल,मात्र एकूणच सडलेल्या व्यवस्थेचे काय ? त्यासाठी समाज म्हणून आपण काय भूमिका घेणार आहोत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारण्याची आणि आत्मचिंतन करून राजकीय नव्हे तर वास्तव उत्तर शोधण्याची आज खरी आवश्यकता आहे
.

Advertisement

Advertisement