मुंबई : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक मोठी पार पत्करावी लागली आहे. आघाडीला एकूण जागांपैकी १० टक्के जागाही मिळाल्या नाहीत. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती होणार की ते पद रिक्त राहणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण जर या पदावर नियुक्ती होणार असं ठरलं तर मविआतील कोणत्या पक्षाचा नेता विरोधीपक्ष नेता होईल? यावरुन आता मविआतच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. आता अध्यक्षांचा हा अधिकार आहे की, कोण विरोधीपक्ष नेता होईल. साधारणपणे ज्या विरोधीपक्षाकडं सर्वाधिक जागा आहेत त्याचा विरोधीपक्ष नेता होतो. पण त्यासाठी एकूण जागांपैकी किमान १० टक्के जागा मिळणं गरजेचं आहे.या नियमानुसार विरोधीपक्षांच्या आघाडीला मिळून देखील १० टक्के जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची नेमणूक केली जाईल किंवा नाही? असा पेच निर्माण झाला आहे. पण आमदारांची संख्या कमी असली तरी अध्यक्ष विशेषाधिकाराद्वारे विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करु शकतात.
त्यामुळं जर विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर कोण विरोधीपक्ष नेता होईल, यावरुन आता मविआत एकमत होत नाहीए. कारण सध्या विधानपरिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळं आता विधानसभेवर काँग्रेसचा विरोधी पक्षानेता असावा असा सूर काँग्रेस नेत्यांचा आहे.
जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असली तरीही काँग्रेस चेहरा देण्यासाठी काँग्रेस नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.