Advertisement

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा विराजमान

प्रजापत्र | Monday, 09/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल नार्वेकर विराजमान झाले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा आज सोमवारी विधानसभेत करण्यात आली. आज विधानसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आज त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या एकमताने निवडीची घोषणा केली.

राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवालयात रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. आज सोमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी दुपारी बारापर्यंत अर्ज भरण्याचा वेळ होता. या कालावधीत महायुतीचे उमेदवार म्हणून केवळ नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाला. २८८ जागांच्या सभागृहात भाजपप्रणीत महायुतीकडे तब्बल २३७ इतके भक्कम संख्याबळ असल्याने महाविकास आघाडीने अध्यक्ष पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झालेत.

Advertisement

Advertisement