मुंबई- मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस नमूद केले. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी पुढाकार घेत महायुती सरकारला सूचना केली आहे.
आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना ३ हजार रुपये देणार होतो
महायुती सरकारला सूचना करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होत आहे. डिसेंबर महिना सुरु आहे. शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा ०१ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो ३ हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना ३ हजार रुपये देणार होतो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजना जी आहे, आताच आमची कॅबिनेट झाली. त्यातही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आपली लाडकी बहीण योजना जी आहे, तिचा पुढचा डिसेंबरचा हप्ता तत्काळ खात्यात जायला हवा. त्यामुळे, आम्ही त्याची पूर्ण तरतूद केली आहे. त्यात काही अडचण नाही. कारण, आम्ही जे निर्णय घेतले आहेत, ते कागदावर राहिले नाहीत, त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.