संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तरप्रदेशातील 5 हजार शेतक-यांता हल्लाबोल मोर्चा दिल्लीवर धडकला आहे. नोएडा आणि दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांना अडविण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडून शेतकरी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चामुळे नोएडातील युमना एक्सप्रेस वे बंद करण्यात आला असून वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
दिल्ली मोर्चासाठी नोएडाहून पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने दलित प्रेरणा स्थानाजवळील नोएडा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येथून पुढे सरसावले आहेत. दरम्यान, नोएडा पोलिसांनी डीएनडीजवळ मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिासांनी मोर्चा रोखण्यासाठी एक्सप्रेस वे वर क्रेन आणि कंटेनर उभे केले आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
संयुक्त किसान मोर्चा (SKM) च्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नोएडाहून दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. हजारो शेतकरी नोएडा येथून दिल्लीतील संसद भवनाकडे मोर्चा काढत आहेत. नवीन कृषी कायद्यांतर्गत नुकसान भरपाई आणि लाभ मिळण्याच्या 5 मागण्यांसाठी शेतकरी आग्रही आहेत. आंदोलक शेतकरी बॅरिकेड्स तोडून नोएडातील दलित प्रेरणा स्थळापासून पुढे निघाले आहेत.
तर दुसरीकडे किसान मजदूर संघर्ष समितीचे (KMSC) सरचिटणीस सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले की, शंभू सीमेवर (पंजाब-हरियाणा सीमा) आंदोलन करणारे शेतकरी 6 डिसेंबरला इतर शेतकऱ्यांसोबत सामील होतील. हे शेतकरी 13 फेब्रुवारीपासून शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. त्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी त्यांना रोखले.
शंभू सीमेवर सतनाम सिंग पन्नू, सुरिंदर सिंग चौटाला, सुरजित सिंग फूल आणि बलजिंदर सिंग हे नेते पहिल्या "गटाचे" नेतृत्व करतील. शेतकरी दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत "शांततापूर्ण" मोर्चा काढतील. मात्र रात्र रस्त्यावरच काढतील.