मुंबई- दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री गावी गेले होते. तिथे त्यांना ताप आला होता. तो ओसरताच ते मुंबईत परतले आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात गृहमंत्री पदासह महत्वाची खाती मागितल्याची चर्चा होत आहे. या कारणामुळे महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबत चालला आहे. आज शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार होती. परंतू, शिंदेंनी आजच्या बैठकाही रद्द केल्या आहेत.
शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलविली होती. ती बैठकही रद्द करण्यात आली आहे. तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांनी शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. या कारणाने शिंदेंनी सर्व बैठका रद्द केल्या आहेत. यामुळे तीन नेत्यांची बैठकही रद्द झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार हे दिल्लीला जाण्यासाठी निघणार आहेत. तीन नेत्यांची बैठक रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला का जात आहेत, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तिकडे भाजपाने ५ डिसेंबरला शपथविधी घेण्याची तयारी सुरु केली आहे.
फडणवीस यांना भेटण्यासाठी राज्यातील नेते, आमदारांनी सागर बंगल्यावर रीघ लावलेली आहे. यामुळे राज्यात काय होणार, शिंदे सरकारबाहेर बसणार की सरकारमध्ये मिळेल ती खाती घेऊन थांबणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.