बांग्लादेशमध्ये अजूनही हिंदुंवरील अत्याचार थांबलेले नाहीत. हिंदूंना संघटित करणाऱ्या चिन्मय प्रभू यांना नुकतीच अटकही करण्यात आली आहे. त्याविरोधात पश्चिम बंगालसह देशात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावरून मोठं विधान केले आहे.
ममतादीदींनी गुरूवारी विधानसभेत बोलताना बांग्लादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आपण केंद्र सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा दुसऱ्या देशातील भारतीयांचा मुद्दा येतो, तेव्हा आम्ही केंद्र सरकारसोबत उभे राहतो. हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. कोणत्याही धर्मातील लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचाही निषेध करतो.
बांग्लादेशात कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचे अजिबात समर्थन करणार नाही, असेही ममता म्हणाल्या. बांग्लादेशातील हिंदू नेते चिन्मय प्रभू यांना अटक केल्याच्या घटनेवर बोलताना ममतादीदी म्हणाल्या, मी राज्यातील इस्कॉन प्रमुखांशी बोलले आहे. हा दुसऱ्या देशातील मुद्दा असल्याने केंद्र सरकारने यावर योग्य कार्यवाही करायला हवी. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी प्रभू यांच्या अटकेची निंदा केली होती. ‘बांग्लादेशमध्ये होत असलेल्या घटना दुर्दैवी आहेत. केंद्र सरकारने निर्णायक कार्यवाही करायला हवी, हे बॅनर्जी यांनी म्हटले होते. तर भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी बांग्लादेशमधील घटनांमध्ये संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.