विधानसभा विधिमंडळामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची पक्षाचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर भास्कर जाधव गटनेतेपदी आणि सुनील प्रभु यांची पुन्हा प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधिमंडळात पक्षाची भूमिका मजबूतपणे मांडण्याची जबाबदारी ठाकरेंच्या अवघ्या २० आमदारांवर असणार आहे.
आदित्य ठाकरे हे वरळीतून विजयी झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवाराचा पराभव केला. ही निवडणूक आदित्य ठाकरे यांना जड जाईल, अशी शक्यता होती. मात्र आदित्य यांनी महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट होत असताना आपली जागा खेचून आणली.
विधानसभेत कोकणातील अवघ्या एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विजय मिळवता आला. गुहागरमधून भास्कर जाधव हे विजयी झाले. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.