Advertisement

 शपथविधीनंतर काही तासांतच नव्या सरकारचं टेन्शन वाढणार!

प्रजापत्र | Sunday, 24/11/2024
बातमी शेअर करा

जालना - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारचा शपथविधी झाला की लगेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे शपथविधीनंतर काही तासांतच नव्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

 

 

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी भावी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सरकार आता तुमचे आहे, मराठा आरक्षण लवकर द्यायचे. बेईमानी करायची नाही. बेईमानी केली तर तुम्हाला खूप भोगावं लागेल. मी आणि आमचा मराठा समाज मैदानातच नव्हता. आम्ही असतो तर तुमच्यात किती दम आहे ते बघितले असते.सरकारला जाहीरपणे सांगतो, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, नाहीतर समाज छाताडावर बसेल. सामुहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. तुमचे सरकार स्थापन झाले की लगेच बैठक घेऊन उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुणाचंही सरकार असलं तरी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही आमच्या लेकरांच्या भविष्यापासून दूर जाऊ शकत नाही. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन करतो. पण मराठा आरक्षणात खोडा घालू नये. नाहीतर मराठा तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला.

Advertisement

Advertisement