नवी दिल्लीः केंद्र सरकारने शेती आणि शेतीमालाशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. त्या कायद्यांविरोधात २०२०-२०२१ मध्ये दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. साधारण वर्षभर चाललेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि तिन्ही कायदे मोदी सरकारने मागे घेतले.
आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन दिल्लीच्या वेशीवर धडकणार आहे. आंदोलक पुन्हा दिल्लीकडे निघणार आहेत, त्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे शंभू बॉर्डरवर मागच्या मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. दिल्लीकडे निघण्याच्या सूचना येताच हे शेतकरी दिल्लीकडे निघतील.''मागच्या ९ महिन्यांपासून सरकारने आमच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही दिल्लीकडे जाऊन सरकारशी बोलणार आहोत. त्यासाठी उपोषण करावे लागेल. साधारण ६ डिसेंबर रोजी शंभू बॉर्डरवर थांबलेले शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.'' अशी माहिती शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी दिली.दरम्यान, शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल हे २६ नोव्हेंबरपासून खनोरी बॉर्डर येथे अमरण उपोषण करणार आहेत. त्यानंतर आंदोलकांकडून सरकारला १० दिवसांची अवधी दिला जाणार आहे. सरकारसोबत चर्चेनंतर शेतकरी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील. सरकारशी सकारात्मक चर्चा झाली नाही तर ६ डिसेंबर रोजी शेतकरी दिल्लीकडे रवाना होतील.