नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्रिपद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कैलाश यांच्या राजीनाम्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्रिपद आणि आप पक्षाचा राजीनामा दिलाय. कैलाश गेललोत यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे.केंद्र सरकारशी लढण्यात आम आदमी पक्षाचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचं गेहलोत यांच्या पत्रात उल्लेख आहे. कैलाश यांचा राजीनामा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला आहे.कैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री आतिशी यांनी म्हटलं की, 'भाजपचे हे घाणेरडे षडयंत्र आहे. ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला दिल्लीतील विधानसभा निवडणूक जिंकायची आहे'.
कैलाश यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की,'मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आज पक्ष मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. काही लोक आश्वासन विसरले आहेत. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन अपूर्ण राहिले आहेत. उदाहरण म्हणजे दिल्लीत यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. आता यमुना नदी आधीपेक्षा जास्त प्रदुषित झाली आहे'.