Advertisement

 पुण्यात खरी लढत काका-पुतण्यातच; ८ ठिकाणी थेट फाईट

प्रजापत्र | Sunday, 17/11/2024
बातमी शेअर करा

पुणे : जिल्ह्यातील २१ पैकी सर्वाधिक १३ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे १२ तर भाजपचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी काका-पुतण्यातच आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट व काँग्रेसचे प्रत्येकी ५, तर शिवसेनेच्या शिंदेगटाचा केवळ एक उमेदवार रिंगणात आहे. बसपने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. यामुळे लढतींमध्ये रंगत आली आहे. भोर व मावळ मतदारसंघात प्रत्येकी २ अपक्ष उमेदवार असले तरी उर्वरित १९ मतदारसंघांमध्ये १५९ अपक्ष असून, एकूण अपक्षांची संख्या १६१ इतकी आहे. जिल्हाभरात सर्व मतदारसंघांमध्ये केवळ २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

 

 

काका-पुतण्या थेट लढत 

जिल्ह्यातील आठ मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी थेट काका-पुतण्या अशी लढत होत आहे. त्यात शहरातील वडगावशेरी व हडपसर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. वडगावशेरीमध्ये शरद पवार गटाचे बापू पठारे विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील टिंगरे अशी लढत होत आहे. हडपसर मतदारसंघात प्रशांत जगताप विरुद्ध चेतन तुपे लढत हाेत आहे. पिंपरी मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत धर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे उभे ठाकले आहेत. ग्रामीण मतदारसंघामध्ये जुन्नर येथे सत्यशील शेरकर यांची अतुल बेनके यांच्याशी लढत आहे. आंबेगावमध्ये देवदत्त निकम हे दिलीप वळसे-पाटील यांच्याशी दोन हात करत आहेत. शिरूरमध्ये अशोक पवार व ज्ञानेश्वर कटके एकमेकांविरोधात उभे आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामती येथील हायव्होल्टेज लढतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे.

 

 

२१ पैकी ५ ठिकाणी भाजप विरूद्ध शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची भाजपविरोधात जिल्ह्यात ५ ठिकाणी लढत आहे. शहरात पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम विरोधात भाजपच्या माधुरी मिसाळ अशी लढत आहे. खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके विरोधात भाजपचे भीमराव तापकीर हे लढत आहेत. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरोधात भाजपचे शंकर जगताप व भोसरीमध्ये अजित गव्हाणे यांच्या विरोधात भाजपचे महेश लांडगे अशी लढत होत आहे. दौंड मतदारसंघात रमेश थोरात यांच्याविरोधात भाजपचे राहुल कुल आहेत.

 

 

काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरूद्ध काँग्रेस अशी लढत पुरंदर व भोर मतदारसंघात पाहायला मिळत आहे. पुरंदरमध्ये संभाजी झेंडे हे काँग्रेसच्या संजय जगताप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांच्याविरोधात लढत आहेत. जिल्ह्यात शिंदेसेनेचा एकच उमेदवार निवडणूक लढत असला तरी महायुतीच्याच अजित पवार गटानेही या ठिकाणी उमेदवार दिला आहे. तसेच भोर मतदारसंघात अजित पवार गटाचे शंकर मांडेकर हे काँग्रेसच्या संग्राम थाेपटे यांच्याविरोधात लढत आहेत. खेड आळंदी मतदारसंघातील अजित पवार गटाचे दिलीप मोहिते हे शिवसेना ठाकरे गटाच्या बाबाजी काळे यांच्याशी दोन हात करत आहेत. तर मावळमध्ये अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी शड्डू ठोकला आहे.

 

 

भाजप विरूद्ध काँग्रेस फक्त तीन ठिकाणी लढत 

भाजप व काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये केवळ तीन ठिकाणी थेट लढत हाेत आहे. त्यात कसबा मतदारसंघातून हेमंत रासने विरूद्ध रवींद्र धंगेकर, तर शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे विरूद्ध दत्तात्रय बहिरट आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे विरुद्ध रमेश बागवे असे एकमेकांविरोधात आहेत. भाजपच्या अन्य लढतींमध्ये कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटारे चंद्रकांत मोकाटे आहेत.

Advertisement

Advertisement