सिल्लोड- सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला. या प्रचारसभेनंतर माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. 'मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौज फाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिला करणार आहे. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही. उबाठाचा सुपडा साफ करणार आहे. मला काय जेल मध्ये टाकता उद्धव ठाकरे यांच्या अजून ४ चौकशा बाकी आहेत. युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू', असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
"उद्धव ठाकरे यांची सरकार उलथून टाकण्यात व मुख्यमंत्री बदलण्याच्या भूमिकेत माझी प्रमुख भूमिका होती. त्यामुळे ठाकरे यांचा थयथयाट होत आहे. भाजप शिवसेनेचा दुश्मन आहे आणि मला पाडण्यासाठी तुम्ही भाजपाचे पाया पडताय. भाजपच्या मतांची भीक मागताय', असा सनसनाटी पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे .उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले होते.
"तुमचे आमचे (भाजप-उद्धवसेना) मतभेद आहेत. त्याच्यासाठी कुणी माझ्याशी बोलायला तयार असाल, तर मी बोलायला तयार आहे. पण, आता आपण सर्व मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू. या सिल्लोडची दहशत गुंडा गर्दी दूर करण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून द्या व गद्दार सत्तार यांना पाडा, नव्हे तर गाडा", असे वक्तव्य केले होते.