Advertisement

विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार

प्रजापत्र | Saturday, 16/11/2024
बातमी शेअर करा

अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच मोठे संकेत दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे सूचक विधान केले. तसेच, राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

 

 

शनिवारी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

 

याचबरोबर, 'बटेंगे तो कटेंगे'च्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्न करत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच, माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, आता प्रकाश आंबेडकर यांच्या सत्तेसोबत जाण्याच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वंचित आगामी काळात नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement