विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी ‘बटेंगे तो कटेंगे’ यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून या घोषणेला विरोध असतानाच भाजपमध्येही दोन मतप्रवाह आहेत. आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावरून टोकाची वेगवेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील नेतेच आता आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला जात आहे. याचे समर्थन करताना फडणवीस म्हणाले, यामध्ये मला चुकीचे काही वाटत नाही. या देशाचा इतिहास पाहा. जेव्हा-जेव्हा विखुरले गेलो, तेव्हा गुलाम बनलो. जात, राज्य, समाजामध्ये जेव्हा आपला देश विभागला तेव्हा गुलाम बनलो. त्यामुळे आपण जर विभागलो गेलो तर तुकडे पडतील. हा देशाचा इतिहास आहे.
अनेक दशके अजित पवार हे हिंदूविरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेसोबत होते. स्वत: धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्यांमध्ये खरी धर्मनिरपेक्षता नाही. हिंदूत्वाला विरोध करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांसाबोत ते होते. लोकांचा मूड काय आहे, हे समजायला अजित पवारांना काही वेळ लागेल. ते लोक (महाविकास आघाडी) जनतेच्या भावना समजून घेऊ शकत नाही किंवा त्यांना वक्तव्य समजलेले नाही किंवा त्यांना वेगळे काही म्हणायचे असावे, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी यापूर्वीही प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’च्या विरोधात सूर आळवला होता. गुरूवारी पुन्हा एकदा ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भाजपच्या काही नेत्यांनीही या घोषणेचा विरोध केला आहे. सबका साथ सबका विकास म्हणजे सगळ्यांच्या साथीने विकास, असे सांगताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याचे समर्थन केले.