वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा एंट्री/एक्झिट A4 जवळ आगीच्या घटना घडली आहे. यामुळे घबराट पसरली आहे. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. स्टेशन परिसराबाहेर लागलेल्या या आगीमुळे स्थानकात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या.
मुंबई अग्निशमन दल सक्रियपणे परिस्थिती हाताळत असून आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विझवण्याचे काम करत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि DMRC चे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन्सची देखरेख करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनला शुक्रवारी दुपारी 1.09 वाजता आग लागल्याचे समोर आले आहे. ग्राउंडमध्ये सुमारे 40-50 फूट खोलवर ही आग लागली. त्यानंतर ही आग परिसरातील लाकडी साठवणूक आणि फर्निचरमध्ये पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी सक्रियपणे काम करत आहेत. नव्याने उघडलेल्या मुंबई मेट्रो मार्ग 3 मध्ये शुक्रवारी ही घटना घडली. आगीमुळे BKC स्थानकावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.