आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांना मंगळवारी महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, वर्मा हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधकांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत शुक्ला यांना डीजीपी पदावरून हटवण्याचे निर्देश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय कुमार वर्मा हे एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होतील.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी लोक मतदानाचा हक्क बजावतील. यापूर्वी डीजीपी बदलाचा निर्णय घेण्यात आला, ज्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राच्या आधी झारखंडमध्ये देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर डीजीपी बदलण्यात आले होते. ज्यामध्ये ऑक्टोबर मध्ये झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने डीजीपींना हटवल्यानंतर त्यांच्या रँकमध्ये सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यास त्यांचा प्रभार सोपवला होता.