पुणे- पुन्हा एकदा बारामतीच्या राजकीय परिस्थितीची देशभर चर्चा सुरु आहे. लोकसभेला पवार कुटुंबातच आमनासामना झाला होता. आता विधानसभेलाही पवार कुटुंब आमनेसामने आलेय. आता काका आणि पुतण्यामध्ये थेट लढत होत आहे. शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नातवाच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे अजित पवार गावो-गोवी जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांना भेटत आहेत. आज सकाळीच अजित पवार बारामती मतदारसंघातील गावात भेटण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं असं विधान अजित पवारांनी बारामतीत केलं आहे. काहींनी ठरवलं होतं की, लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं होतं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत ९ हजार कोटी निधी देण्याचं काम केलं. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तुम्ही मला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करायचे आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असे काही लोकांनी ठरवले होते. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं होतं. आता काय करायचं ते तुमचा अधिकार आहे. मत मागण्याचा, विनंती करण्याचा माझा अधिकार आहे. त्यासाठी मी गावात आलो आहे.
लोकसभेला नणंद आणि भावजय यांच्यामध्ये लढत झाली होती. लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील मतदारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का सहन करावा लागला होता. आता अजित पवारांविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अजित पवार यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय. गावोगावी जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांना ते भेटत आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय चर्चा होत आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं, असे वक्तव्य अजित पवार यांनी केलेय.