बीड: विधानसभा निवडणुकीत ज्याला पाठिंबा द्यायचा तो निवडून येऊ शकणारा उमेदवार अपक्ष हवा अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केलेली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात ज्योती मेटे यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तर राजेंद्र मस्के देखील त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे आता अपक्षांमधून कोणाला निवडायचे असेल तर कुंडलिक खांडे, सुरेश नवले, रमेश पोकळे ही नावे जरांगेंसमोर असु शकतात. यातील कुंडलिक खांडेंना मनोज जरांगेंचा आशीर्वाद मिळणार का याच्या चर्चा सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगेंच्या आशीर्वादावर अनेक लोक अवलंबून आहेत. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने कोणत्याच पक्षात नसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंचे काम केल्याची क्लीप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांना शिवसेनेने पदमुक्त केले होते. त्यानंतर खांडे कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी सरपंच संघटनेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण सुरु ठेवलेले असुन पुन्हा जनसंपर्काला लागले आहेत. खांडे यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे आता खांडे यांना जरांगे आशीर्वाद देणार का याचीच उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
बातमी शेअर करा