आठवण
बीड दि.22 ( प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात ज्या काही नावांना परस्परांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाते त्यात क्षीरसागर- मेटे ही अशीच एक जोडी. कधी एकाच पक्षात असताना तर कधी वेगवेगळ्या पक्षात असताना एकमेकांची गोची करण्याचे किंवा अडचणी वाढविण्याचे काम जयदत्त क्षीरसागर आणि दिवंगत विनायक मेटे यांनी केले होते. आता ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी (एसपी) मध्ये प्रवेश केल्याने आ. संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय अडचणी वाढत आहेत.
राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही म्हणतात तसेच राजकीय समीकरणे कधी बदलतील हे देखील सांगता येत नाही. आता बीडचेच घ्या ना. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील आ. संदीप क्षीरसागर हे ठामपणे, अनेक प्रलोभने डावलून शरद पवारांसोबत राहीले होते आणि त्यामुळेच त्यांच्याकडे शरद पवारांचे 'लाडके' म्हणून देखील पाहिले जाते. विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आणि बीड विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनेकांनी मोर्चेबांधणी केली तरी आ. संदीप क्षीरसागर यांनी मात्र अद्याप मौन पाळले आहे. ते भलेही मुलाखतीला गेले नाहीत मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. अगदी कालपरवापर्यंत आ. संदीप क्षीरसागर यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या स्मीतहास्यामागे 'उमेदवारी आपल्यालाच मिळणार' हा ठाम विश्वास दिसायचा, आता मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंनी थेट शरद पवारांच्याच उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) मध्ये प्रवेश केला. आता ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश निव्वळ संघटनात्मक कार्यासाठी तर झालेला नसणारच, यात विधानसभा उमेदवारीची गणिते असणारच आणि मग यामुळे गोची होणार ती साहजिकच आ. संदीप क्षीरसागरांची.
असेही एकाच पक्षात राहून क्षीरसागर- मेटेंकडुन एकमेकांची गोची करण्याचा इतिहास जिल्ह्याला नवा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली त्यावेळी बीड जिल्ह्यातील जे नेते शरद पवारांसोबत गेले त्यात जसे जयदत्त क्षीरसागर होते तसेच दिवंगत विनायक मेटेही. जयदत्त क्षीरसागर हे ओबीसी नेते तर विनायक मेटेंचा आधार मराठा राजकारणाचा. त्यातूनच मग जिल्ह्यातील सत्ता स्पर्धेत एकाच पक्षात असलेले विनायक मेटे - जयदत्त क्षीरसागर अनेकदा समोरासमोर आलेले. अगदी विनायक मेटेंच्या कुटुंबातील सदस्याचा त्यांच्या गावात पराभव व्हावा यासाठीची मोर्चेबांधणी क्षीरसागरांची तर जयदत्त क्षीरसागर विधानसभेत पराभूत व्हावेत यासाठी चार समीधा विनायक मेटेंनिही टाकलेल्या. अखेर याच संघर्षातून आणि इतरही कारणांमुळे पुढे विनायक मेटे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, पण क्षीरसागर मेटे राजकीय वाद कधी बाजार समिती, कधी नगरपालिकेत पहायला मिळायचा, अगदी २०१४ मध्ये जयदत्त क्षीरसागर- विनायक मेटे समोरासमोर विधानसभा निवडणूक देखील लढले, त्यात मेटेंचा पराभव झाला. नंतरही विनायक मेटेंच्या हयातीत मेटे- क्षीरसागर राजकारणातले विरोधक म्हणूनच ओळखले जायचे.
आता हे सारे यासाठी आठवायचे की, उद्या काय होईल ते माहित नाही, पण ज्योती मेटेंचा राष्ट्रवादी (एसपी) प्रवेश आज तरी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासाठी डोकेदुखीचा आहेच त्यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांच्या वाटेत देखील नाही म्हणले तरी अडथळे आणणारा आहे.
बातमी शेअर करा