Advertisement

मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेतो, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही

प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई-  जोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेच्या यशाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.  आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, ही योजना बंद होऊ देणार नाही असेही अजित पवार म्हणाले. 

Advertisement

Advertisement