Advertisement

तक्रार देण्यासाठी निघाला, कारखाली चिरडले

प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा

कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : शिवीगाळ केल्याची पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलासह निघालेल्या शेतकऱ्याला कारखाली चिरडून त्याचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली. रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

 

गुरुवारी सायंकाळी शेतीची कामे आटोपून रावसाहेब, त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात अमोल बळीराम शिंदे (रा. धोत्रे, ता. कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता. ट्रक्टरला वाट देण्यावरून वाद झाल्याने थोड्या वेळाने अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोनवरून  शिवीगाळ केली.  

याबाबत  रावसाहेब गागरे, प्रवीण गागरे व प्रशांत गागरे हे अमोल शिंदेविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलवरून कोपरगावकडे निघाले. तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने कारने गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अमोल शिंदे याने गागरे यांच्या अंगावरून दोन-तीन वेळेस कार नेत रावसाहेब यांचा खून केला.

 

 

डिस्चार्ज मिळताच आरोपीला अटक होणार
- आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस पथक वैजापूरला गेले. शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. तेथे योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती संदीप कोळी यांनी दिली. 

Advertisement

Advertisement