आरसा विधानसभेचा / परळी
किरण धोंड
परळी वैजनाथ दि. १४: मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टरच्या जोरावर शरद पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतच गुंतवण्याचा पवारांचा डाव असल्याचे दिसून येते. त्याचाच भाग म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि आमदार पंकजा मुंडे यांचे एकेकाळचे समर्थक राजाभाऊ फड यांचा पवार गटात प्रवेश करून घेतला असल्याचे म्हटले जात आहे. पवारांच्या डावानंतर आता मुंडे बहीण भावाच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बडे नेते पवारांकडे जात असल्याने विधानसभेला धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या विचाराला मानणारा असून लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरच्या जोरावर मुंडे बहीण भावाला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता विधानसभेला सुद्धा बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील सर्व आमदार आपल्याच पक्षाचे करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची ताकद संपूर्ण जिल्हाभर आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते सुद्धा तयार असल्याने सर्वच सहा मतदारसंघावर आपलाच आमदार निवडून आणण्यासाठी मुंडे बहीण भावाने सुद्धा जोरदार फिल्डिंग लावली आहे. धनंजय मुंडे यांची आजही जिल्ह्यावर चांगलीच पकड असल्याने तेच विधानसभा निवडणुकीत चांगला प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना परळीतच घेरण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याचे दिसते. त्याचाच भाग म्हणून राजभाऊ फड यांचा पवार गटात झालेला प्रवेश असल्याचे म्हटले जात आहे. राजाभाऊ फड हे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि आमदार पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. परळी मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून विधानसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवाराला फड यांचा फायदा होऊ शकतो. परळी मतदारसंघातील मराठा समाजातील बडे नेते मुंडे यांच्या विरोधात तर आहेतच पण ओबीसी मधील नेते सुद्धा आता विरोधात जाऊन पवारांच्या पक्षात प्रवेश करीत आहेत. परळीतच धनंजय मुंडे यांना घेरले तर त्यांना इतर मतदारसंघात लक्ष घालता येणार नाही. तसेच त्याचा फायदा आघाडीला होणार असल्याचे पवारांची खेळी मुंडे यांना अडचणीत आणणारी असू शकते.
----
ही आहेत धनंजय मुंडेंची बलस्थाने
गेल्या पाच वर्षात परळी मतदारसंघात जे विकास कामे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली ते करताना त्यांनी जात पात कधीही पाहिली नाही ज्या गावाला विकासाची गरज होती त्या गावाला निधी दिला त्यामुळे ओबीसीच नाही तर मुस्लिम मराठा समाजात सुद्धा त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे सर्व समाजात असलेले कार्यकर्ते आणि विकास कामांच्या जोरावर धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत विरोधकांना भारी पडतील असे सामान्य नागरिकातून म्हटले जात आहे.
---
ओबीसीचे बडे नेते मुंडेंच्या विरोधात
शरद पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना तगडे अवाहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असून परळी मतदारसंघातील बरेच ओबीसी नेते सध्या पवारांच्या गळाला लागले असल्याचे दिसते यात सुदामती गुट्टे, बबन गीते, राजाभाऊ फड, फुलचंद कराड यांचा समावेश आहे तर प्राध्यापक टी. पी. मुंडे हे सध्या अलिप्त भूमिकेत असल्याचे दिसते.
--
बातमी शेअर करा