परळी दि.१२ (प्रतिनिधी)- येथील बसवेश्वर कॉलनीतील एका महिलेस परळी -नांदेड बसमधून प्रवास करीत असताना बसमध्ये शेजारी बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने बिस्किट व पाणी देऊन बेशुद्ध करून हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा प्रकार आठ ऑगस्ट रोजी घडला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात परळीच्या संभाजीनगर पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर एक महिन्यांनी म्हणजे १० सप्टेंबर रोजी आरोपीस बोधेगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अटक केली आहे. अमोल धोंडीबा मस्के ( रा बोधेगाव तालुका फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अधिक माहिती अशी की; परळी येथील बसवेश्वर कॉलनीतील कमलबाई ज्ञानोबा सुरवसे ( ५०) या (दि.८ ऑगस्ट) रोजी सकाळी परळी ते नांदेड बस मधून प्रवास करत होत्या. दगडवाडी फाट्याजवळ बस येताच शेजारी बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने कमलबाई यांना पाणी प्यायला व खायला बिस्कीट दिले त्यातून कमलबाई यांना गुंगी आली व त्या बेशुद्ध झाल्या. याचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या होत्या .याप्रकरणी शुद्धीवर आल्यानंतर कमलबाई सुरवसे नांदेडहून परत आपल्या परळी गावी आल्या व त्यांनी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नऊ ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्ति विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नरहरी नागरगोजे यांनी तपासाची चक्रे फिरविली व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती दिली. बोधेगाव तालुका फुलंब्री येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार अमोल धोंडीबा मस्के यास अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली आहे व तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज मुद्देमालही पोलिसानी जप्त केला आहे.
ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके ,अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे,जमादार नरहरी नागरगोजे, व्यंकट डोरनाळे , भगवान चव्हाण शंकर डेंगळे यांच्या पथकाने केली