गेवराई दि.२८ (प्रतिनिधी) - तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या शिपायाचा विजेचा शॉक बसल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. पाण्याची मोटार चालू करत असतांना अचानक हातावर वायर पडल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगण्यात आले . ग्रामपंचायतने गावठान विहीरीवर विद्युत पुरवठा करणाऱ्या मोटारीजवळ बॉक्सची व्यवस्था केली असती तर ही दुर्देवी घटना घडली नसती.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांपासून मसू विश्वंभर अडागळे (वय २७) हे शिपाई म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी होती. दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ते अंबिका नगर येथील पाणी पुरवठा करण्यासाठी गावठाण विहीरीवर पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. परंतू मोटार चालू करत असतांना त्यांच्या हातावर वायर पडल्याने करंट लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सपोनि सामेनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील कोळी, बाळासाहेब भवर, गोपनीय शाखेचे विठ्ठल चव्हाण, बीट अंमलदार काकडे, पोह. खांडे आदि घटनास्थळी दाखल झाले होते. मयत मसू विश्वंभर अडागळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूने कुटूंब उघड्यावर पडले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.