Advertisement

संपादकीय अग्रलेख-विश्वास ठेवायचा तरी कोणावर?

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

        वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली परीक्षा, ज्यासाठी केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक देखील जिवाचे रान करतात, अशा 'नीट'च्या परीक्षेसंदर्भात देखील आता संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. तसे तर ही परीक्षा झाली, त्याचवेळी पेपर फुटीपासून ते परीक्षा गैरव्यवहारापर्यंतचे अनेक आरोप झाले होते, मात्र परीक्षा नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेने अपेक्षेप्रमाणे हे आरोप फेटाळून लावले. मात्र आता 'नीट' च्या निकालात आजपर्यंत कधीच झाले नाही असे 'आक्रित' घडले आहे . या परीक्षेत तब्ब्ल ६७ उमेदवारांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले आणि त्यातील ५ उमेदवार हे एकाच केंद्रावरचे आहेत. निकालातल्या गंमती अजूनही आहेतच, त्यामुळे आता नीट सारख्या परीक्षेतील पारदर्शीपणा देखील हरवणार असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर?
 

 

    सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'नीट ' अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आल्यापासून या परीक्षेचे महत्व देशभरात अधिकच  वाढले. भलेही आज करिअरच्या अनेक संधींवर बोलले जात असेल, पण आजही वैद्यकीय क्षेत्राकडे एक महत्वाकांक्षी क्षेत्र म्हणूनच पाहिले जाते. वैद्यकीय प्रवेश म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारा वर्ग आजही खूप मोठा आहे. यात काही वावगे आहे असे देखील नाही, पण म्हणूनच या क्षेत्राकडे येण्यासाठीची स्पर्धा तितकीच मोठी आहे. त्यासाठीची जीवतोड मेहनत आणि आताशा 'नीट' सारख्या परीक्षेतही 'काहीही करून' यश मिळविण्याचा अट्टाहास या परीक्षेच्या पारदर्शीपणाबद्दल देखील संशय निर्माण करीत आहे.  

 

     यावर्षी एकतर नीटच्या परीक्षेच्या वेळीच गैरप्रकाराचे, पेपरफुटीचे आरोप झाले होते, मात्र ही परीक्षा घेणाऱ्या 'एनटीए ' ने हे सारे आरोप फेटाळले होते. बरे या परीक्षेचा निकाल चौदा जूनला जाहीर करणार असं जाहीर करुनही दोन दिवसांपूर्वी उत्तरतालिका प्रकाशित करुन अचानक नियोजित तारखेच्या आधीच  जाहीर केला. हा निकाल जाहीर झाला त्यावेळी सारा देश लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये व्यस्त होता. त्यामुळे 'नीट' च्या निकालातील 'आक्रित' गोष्टींकडे  ना कुणाचे लक्ष गेले, ना याला प्रसिद्धी मिळाली. एरवी एखाद्या दुसऱ्याला  या परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण  पडतात तिथे ह्यावर्षी तब्बल ६७ जणांना तितके मार्क पडले आहेत, पहिल्या शंभर जणांची यादी 'एनटीए' (नॅशनल टेस्टिंग एजन्सी)  त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करते. त्यात मोठ्याप्रमाणावर परीक्षार्थी हरियाणाच्या एकाच परीक्षा केंद्रामधून  आहेत. तामिळनाडूमधील चार, बिहारमधल्या दोनतीन एकाच सेंटरमधल्या मुलांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. उणे गुणांकन पद्धती असल्याने जो गुणांचा आकडा मिळणेच शक्य नाही, तसे गुण काहींनाच मिळाले. यावर एनटीएने 'उशीरा पेपर मिळाल्याने वेळेचे नुकसान झाले, म्हणून त्यांना काही उमेदवारांना अधिकचे गुण दिले गेले' असा खुलासा केला आहे. मात्र अशी काही सवलत असते याची माहिती एनटीएने परीक्षेच्या अगोदरच सर्वांसाठीच जाहीर का केली नव्हती हा प्रश्न आहेच. बरे एनटीएने जादा  गुणांची ही कृपा केवळ 'काहींनाच' का झाली याचेही उत्तर मिळत नाही. यासंदर्भात आता सदर परीक्षा दिलेले विद्यार्थी तक्रारी करीत आहेत, मात्र एनटीए काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही.

 

       मुळात मागच्या काही वर्षात देशभरातच वेगवेगळ्या परीक्षांमधील घोटाळे समोर येत आहेत. अशी एकही परीक्षा नाही, ज्यात घोटाळा होत नाही असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे. नोकरभर्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या बहुतांश परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत, असे असतानाच आता 'नीट' परीक्षेभोवती देखील वाद निर्माण होणार असतील तर सामान्यांनी करायचे काय? यापूर्वी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी झालेल्या 'नीट' बद्दलही काही आक्षेप निर्माण झाले होतेच. त्यात झालेले गुणांकन आणि इतर बाबी संशय वाढविणाऱ्या होत्या, आता पदवी प्रवेशासाठी देखील कांहीं पारदर्शी राहणार नसेल, किंबहुना अशा परीक्षेभोवती देखील संशयाचे मळभ निर्माण होणार असेल तर यातून लाखो विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.
 

Advertisement

Advertisement