महाराष्ट्रात येऊ पाहणारे काही प्रकल्प गुजरातला किंवा राज्याबाहेर गेले, त्यानंतर महानंद या महाराष्ट्राच्या दूध उद्योगातील शिखर संस्थेवर गुजरातच्या 'आनंद' चे नाव लागले हे सारे होत असतानाच पुण्याच्या हिंजवडी या आयटी पार्कमधून तब्बल १३९ कंपन्यांनी स्थलांतर केल्याचे आता समोर येत आहे. मागच्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या औद्योगिक आघाडीवरची ही परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा विकास केल्याच्या गप्पा मारल्या जात असताना आणि कथित डबल इंजिनचा विकासासाठी वापर होत असल्याचे सांगितले जात असतानाचे महाराष्ट्राचे विकासाचे हे वास्तव भयाण आहे.
एकेकाळी औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्राचा देशात अग्रक्रम असायचा, पण आता तो इतिहास झाला आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुळात राज्यात रोजगार निर्मितीसोबतच आर्थिक उन्नती साधायची असेल तर नवनवे प्रकल्प राज्यात आले पाहिजेत, असलेले टिकले पाहिजेत हे पाहणे राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. मात्र मागच्या एक दोन दशकात महाराष्ट्राचे राज्यकर्ते असा काही विचार करतात असे विधान करणे देखील धाडसाचे होईल अशी परिस्थिती आहे. ज्या महाराष्ट्रात पूर्वी उद्योग येण्यासाठी धडपडायचे, त्या महाराष्ट्राकडे आता उद्योजक पाठ फिरवित आहेत आणि एकेकाळी उद्योजकांसाठी फारसे लाडके नसलेले राज्य गुजरात आता उद्योजकांचे नंदनवन ठरत आहे याचाही विचार महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे.
मागच्या काही वर्षात पुण्याच्या हिंजवडी या आयटीपार्कमधून थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १३९ कंपन्यांचे स्थलांतर झाल्याची बाब आता समोर येत आहे. पुण्याचे हिंजवडी म्हणजे आयटीचे मोठे केंद्र मानले जात होते, त्या भागाची अवस्था अशी असेल तर इतर भागांबद्दल काय बोलावे? पुण्यासारख्या महानगरात पायाभूत सुविधा नाहीत आणि वाहतूक कोंडी होते अशी कारणे दाखवित अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. यापूर्वी मराठवाड्याची राजधानी असलेल्या पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर मधील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या, अगदी बजाज, व्हिडीओकॉन यांनी आपला विस्तार थांबविला होता. त्या भागातील सामाजिक अस्थिरता हे त्यासाठीचे मोठे कारण सांगितले जात होते. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या पलीकडे असेही महाराष्ट्रात औद्योगिक विकास फारसा जाणवत नाही. इतर ठिकाणी भलेही कितीही पंचतारांकित औद्योगिक वसाहती उभारण्याची घोषणा होऊ दे, त्या ठिकाणी कोणते मोठे उद्योग आल्याचे मागच्या काही वर्षात तरी ऐकिवात नाही. मात्र यासाठी आपले राज्यकर्ते काही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत.
रोजगार निर्मितीच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्राचे महत्व मोठे असते. उत्पादन क्षेत्र असेल व आयटी किंवा इतर सेवा क्षेत्र, यामधून त्या त्या भागातील बेरोजगारांना सामावण्याची क्षमता असते, मात्र त्या उद्योगांना 'विश्वासार्ह' वाटावे असे वातावरण निर्माण करण्यात महाराष्ट्र मागच्या काही काळात कमी पडत आहे. महाराष्ष्ट्र आता उद्योजकांना 'उद्योगस्नेही' का वाटत नाही याचाही विचार व्हायला हवा, पण त्या दृष्टीने कोणतेच राज्यकर्ते काही बोलायला तयार नाहीत. नाही म्हणायला, आपले मुख्यमंत्री, कधी उद्योगमंत्री डावोस किंवा आणखी कोठे जाऊन आपल्याकडे अमूक कोटीची गुंतवणूक येणार आहे असे अधून मधून सांगत असतात, मात्र त्या घोषणा अजूनतरी प्रत्यक्षाच्या जवळपास देखील पोहोचलेल्या नाहीत. आणि याउलट आहेत ते उद्योग राज्यातून, प्रमुख महानगरांमधून स्थलांतरित होत आहेत, अशावेळी महाराष्ट्राचा विकास खरेच होणार कसा?
अगोदरच्या महाराष्ट्रात औद्योगिंक विकासाच्या बाबतीतही प्रादेशिक असमतोल फार मोठा आहे. एकूणच राज्याच्या सर्वांकष विकासाचे म्हणून काही धोरण नाही. राज्यात प्रशासकीय किंवा राजकीय पातळीवर स्थिर वातावरण राहिलेले नाही. सामाजिक पातळीवरची अस्थिरता मोठी आहे आणि ती अधिकच वाढत आहे. आपली धोरणे उद्योगाला पोषक नाहीत आणि शेजारची राज्ये आपले उद्योग पळवित असताना ते रोखण्याची राजकीय धमक आणि इच्छाशक्ती येथील राज्यकर्त्यांमध्ये नाही , मग महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणार तरी कसे ?