बीड दि.१९ (प्रतिनिधी)-शहरातील विविध हॉटेलच्या लॉजिंगमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी (दि.१९) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी झाडाझडती मोहिम राबविल्याचे समोर आले.या मोहिमेतुन पोलिसांच्या हाताला काही लागले नाही मात्र त्यांच्या या धाडसत्राची चर्चाच मात्र अधिक राहिली.विशेष म्हणजे बीडमधील लॉजिंगच्या झाडाझडतीचे कौतुक व्हायला हवे पण दुसरीकडे स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या बंद खोलीतील कारभाराकडे मात्र पोलिसांचा कानाडोळा होतोय.कारण स्पाच्या नावाखाली कॅबिनमधील 'मंद' प्रकाशात नेमके काय चालते याच्या तपासणीसाठी
ना पोलीस ठाण्यांना वेळ आहे,ना स्थानिक गुन्हे शाखेला किंवा लॉजिंगची तपासणी करणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाला.त्यामुळे आता यामागे अर्थकारणाचा गौडबंगाल दडलाय की अन्य काही कारणामुळे याकडे दुर्लक्ष होतंय हे न उलघडणार कोड बनलं आहे.
अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाची जबाबदारी घेतल्यापासून पल्लवी जाधव यांनी अनेक चर्चेतील कारवाया केल्या शुक्रवारी सकाळपासून त्यांनी बीड शहारातील विविध हॉटेलला भेट देत लॉजिंगची पाहणी करत काही गैरप्रकार तर सुरु नाहीत ना याची खात्री केली.अचानकपणे पोलिसांनी हॉटेलच्या तपासणीची मोहीम हाती घेतल्याने हॉटेल चालकांमध्ये थोड्यावेळासाठी धावपळ उडाली होती.बीडमध्ये कुठेही त्यांनी तपासणी केलेल्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आला नाही.मात्र आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यावरून आम्ही ही मोहीम राबविल्याने दस्तुरखुद पल्लवी जाधव यांनी 'प्रजापत्र' शी बोलताना म्हटले आहे.हॉटेल चालकांनी रूम देताना अल्पवयीन मुलामुलींना रूम देऊ नये आणि आधार कार्ड घेऊनच रूम द्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले.तर दुसरीकडे लॉजिंगच्या झाडाझडती झाल्या पण बीडमध्ये आजघडीला ८ स्पा सेंटर सुरु असताना या सगळीकडेच दुर्लक्ष का होत आहे.एक एक स्पा चालक महिन्याला साधारण ३ ते ४ लाखांची उलाढाल करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार एका स्पामध्ये किमान ३ ते कमाल ६ ते ८ मुलींना मसाज करण्यासाठी कामाला ठेवण्यात आले आहे.बरं येथे केवळ मसाज न करता बंद दाराआड चालणाऱ्या अवैध उद्योगाची माहिती असतानाही त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना खरंच वेळ नाही का.शहरातील एखाद दुसरा स्पावाला अवैध कारभाराला थारा देत ही नसेल पण अनेक ठिकाणी ‘स्पा’चा नावाखाली मंद प्रकाशात सुरु असलेले राजरोजपणाचे अश्लील चाळे थांबण्यासाठी पोलीस लॉजिंगसारखीच झाडाझडतीची मोहीम हाती घेणार आहेत की नाही?
सर्वाधिक वसुली स्पावाल्यांकडून ?
मिळालेल्या माहितीनुसार एका स्पा चालकाला महिन्याला साधारण ७० ते ८० हजार रुपये हप्ता पोलिसांना द्यावा लागत असल्याच्या चर्चा होत्या.सध्या पोलीस उपाधीक्षक आणि अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाने (नवीन अधिकारी आल्यापासून) हप्ते न घेतल्याने त्यांचे १५ हजार आणि अनुक्रमे १० हजार असे २५ हजारांची बचत होत आहे.पण पोलीस ठाणे ३५ हजार आणि स्थानिक गुन्हे शाखा १० हजार असे ४५ हजार हप्ता सध्या तरी स्पा चालकाला द्यावा लागत आहे.त्यात पोलीस उपअधीक्षक आणि अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाचा हप्ता सुरु झाल्यास हा खर्च ७० ते ८० हजारांच्या घरात जातो अशीही माहिती आहे.