Advertisement

संपादकीय अग्रलेख- भाजपची ओढाताण

प्रजापत्र | Thursday, 14/03/2024
बातमी शेअर करा

एकीकडे देशभरात ‘चारशे पार’चे स्वप्न भाजप पाहत असला तरी प्रत्यक्षात मात्र या पक्षाला एकएका जागेसाठी कसरत करावी लागत आहे. देशातला सर्वशक्तीमान म्हणवणारा हा पक्ष असला तरी या पक्षाला देखील अनेक ठिकाणी ‘लायक’ उमेदवार शोधावे लागत आहेत. महाराष्ट्रातील केवळ २० जागाच या पक्षाला पहिल्या टप्प्यात जाहीर करता आल्या यातच सारे काही आले. त्यातही भाजपला पंकजा मुंडे असतील किंवा सुधीर मुनगुंटीवर यांना इच्छेविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागले आहे. 

 

 

भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० मतदार संघातील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. खरेतर ज्या पद्धतीने भाजपकडून ‘चारशे पार’चे स्वप्न पाहिले जात आहे ते पाहता या पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. कारण जर खर्‍या अर्थाने भाजपला आपल्या जागा चारशेच्या पुढे न्यायच्या असतील तर त्यांना महाराष्ट्रासोबतच दक्षिणेतील राज्यांमध्ये आपल्या जागा वाढवाव्या लागणार आहेत. कारण उत्तरेकडील हिंदीभाषीक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळविल्यानंतरही भाजपला ३१३ च्या पुढे जाता आले नव्हते. आता यावेळी उत्तरेकडील राज्यांमध्ये मागच्या वेळेपेक्षा काही तरी आणखी भरीव मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे जे काही प्रयत्न करायचे आहेत ते महाराष्ट्रासह दक्षिणेकडी राज्यांमध्येच करावे लागणार आहे.
म्हणूनच महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांना सोबत घेण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपने फोडले मात्र इतके झाल्यानंतरही भाजपला अद्याप महाराष्ट्रातले जागा वाटप जाहीर करता आलेले नाही. इतर ठिकाणी जी दादागिरी भाजप सातत्याने करत आला ती दादागिरी त्यांना महाराष्ट्रातही करायची आहे. अर्थात जे लोक ईडीच्या किंवा सीबीआयच्या भीतीने सत्तेसोबत गेले आहेत त्यांना फार काळ आपली ताठरता ठेवता येणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात किमान ३२ जागा लढविण्याची भाषा करणारा भाजप पहिल्या टप्प्यात केवळ २० मतदार संघातच उमेदवार जाहीर करतो यालाही खुप वेगवेगळे आयाम आहेत.

 

महाराष्ट्रात मागच्या काही काळात आरक्षण आंदोलनामुळे असेल किंवा इतर काही कारणांनी जे सामाजिक वातावरण तयार झाले आहे, शेतकर्‍यांमध्ये जी एकप्रकारची अस्वस्थता आहे ते सारे पाहता अनेक जण भाजपकडून लोकसभा निवडणुक लढवायला नकार देत आहेत. नारायण राणेंसारखा केंद्रीय मंत्री राहिलेला माणुस लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नसेल तर यातच खुप काही आले. भाजपला एकएका जागेवर उमेदवारांना जबरदस्तीने उतरवावे लागत आहे ही बाजू देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.
बीड लोकसभा मतदार संघासाठी खरेतर पंकजा मुंडेंना निवडणुक लढविण्याची इच्छा नव्हती मात्र त्यांच्याशिवाय या मतदार संघात पर्याय नाही हे लक्षात आल्याने भाजपने त्यांना जबरदस्तीने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. चंद्रपुरमध्ये सुधीर मुनगुंटीवारांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. एकीकडे एक घर एक उमेदवार असे धोरण सांगितले जात असतानाच राधाकृष्ण विखेपाटील राज्याच्या मंत्रीमंडळात असतानाही अहमदनगरमधून डॉ.सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणून या ठिकाणी भाजप सोयीस्करपणे आपले निकष बदलत आला आहे. एकंदरच लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवायचे असेल तर त्यासाठी खुप काही तडजोडी भाजपला कराव्या लागणार आहेत. आता कुठे त्याची सुरूवात झाली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच या पक्षाची ओढाताण सुरू आहे. आणखी तर पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे.

Advertisement

Advertisement