मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांत अनेक भागांत(cm fadnavis) अतिवृष्टीचा जोर वाढला आहे. सध्या १५ जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणात विशेष मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी या भागांत पावसाचा जोर अधिक असून, नांदेडच्या मुखेड येथे २०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही २०० मिमी पावसाची नोंद झाली असून, चेंबूर भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे. राज्यातील अनेक भागांत घरांचे नुकसान आणि जनावरे दगावली आहेत. सुमारे दोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१८) पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कर, NDRF आणि SDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, रावणगावातून २०६ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मराठवाड्यात ६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, नांदेडमध्ये ३, बीडमध्ये २ आणि हिंगोलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात NDRF, तर नांदेडमध्ये SDRFची टीम कार्यरत आहे. पुण्यातून लष्कराची २० जणांची टीम नांदेडला रवाना करण्यात आली आहे. मुंबईत १४ ठिकाणी वॉटर लॉगिंग झाले असून, लोकल ट्रेनची गती कमी करण्यात आली आहे, मात्र कुठेही ट्रेन्स थांबलेल्या नाहीत.
प्रशासन सतर्क; धरणे सुरक्षित, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हिप्परगी धरण पूर्ण भरल्याने त्याचा विसर्ग करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. तसेच, इसाठपूर आणि विष्णुपुरी धरणांचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुंबईत पुढील १०-१२ तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, संध्याकाळी साडेसहा नंतर हाय टाइड आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच बाहेर पडावे, तसेच ज्या भागात रेड अलर्ट आहे, त्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर ४ मीटरपर्यंत लाटा येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाण्याचे टाळावे. नुकसान भरपाई देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शाळांना सुट्टीबाबत निर्णय हवामानाचा अंदाज पाहून घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.