Advertisement

लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर

प्रजापत्र | Saturday, 03/02/2024
बातमी शेअर करा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्राऊंड लेव्हलवरून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात करून उपपंतप्रधान पदी विराजमान होऊन देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. गृहमंत्री आणि सूचना आणि प्रसारण मंत्री रुपानेही त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांचा संसदेतील सहभाग नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त राहिले होते. जानेवारी महिन्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा अतिभव्य सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. वादग्रस्त बाबरी मस्जिद ठिकाणी राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना आमंत्रण नाकारण्यात आलं होतं. यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु, प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं. थंडी वाढली होती, त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं.
 

Advertisement

Advertisement