वाशिम- शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. राज्यात महायुतीचे तर केंद्रात एनडीएचे सरकार आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी यांना मोठा झटका बसला आहे.
खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. २९ डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिली होती. आयकर विभागाने पाच जानेवारीपर्यंत भावना गवळी यांना आपलं म्हणणं मांडायला सांगितले होते. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिलं होतं. मात्र त्यावर आयकर विभागाचे समाधान झालं नाही. त्यानंतर आयकर विभागाने अखेर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवली आहेत.