लोकसभेतून १४१ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर दिल्लीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढला. यावेळी विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवत या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
काय म्हणाले शरद पवार?
"लोकशाहीमध्ये संस्थेला महत्व असते. ज्याचा मान आपण राखतो. संसदेत जे झालं ते देशाच्या इतिहासात याआधी कधीही झालं नाही. १५० खासदारांना संसदेच्या बाहेर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य संसदेत झाले होते. चार- पाच दिवसांपूर्वी संसदेत घुसखोरी झाली. याच घुसखोरीसंदर्भात प्रश्न विचारले, त्यांना पास कोणी दिले? ते संसदेत कसे आले? यावर चर्चा होणे गरजेचे होते. ज्याची मागणी विरोधकांनी केल्याचे शरद पवार म्हणाले.