Advertisement

लाचखोरीत राज्यात पोलीस तर जिल्ह्यात महसूल विभाग आघाडीवर

प्रजापत्र | Monday, 28/12/2020
बातमी शेअर करा

बीडमध्ये सात हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचार्‍याला पकडले

बीड : मागच्या सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्यातील लाचेच्या सापळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घेतली. मागच्या सहा वर्षातील सर्वात कमी सापळ्यांची नोंद यावर्षी झाली आहे. मात्र झालेल्या सापळ्यामध्ये राज्यात सर्वाधिक सापळे पोलीस विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांवर पडले तर बीड जिल्ह्यात मात्र महसूल विभाग लाचेच्या सापळ्यामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.27) बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला सात हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. चरणसिंग वळवी असे त्या कर्मचार्‍याचे नाव असून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात पुढे कारवाई न करण्यासाठी वळवीने लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येतात. मागच्या काही वर्षात यासंदर्भात जागृती होऊ लागल्याने या विभागाकडे येणार्‍या तक्रारींची संख्या देखील वाढली होती. मात्र 2020 हे वर्ष लाचेच्या कारवायांसाठी तसे कमजोर ठरले. गतवर्षी वर्षभरात राज्यात तब्बल 866 कारवाया झाल्या होत्या , तर या वर्षी हि संख्या 600 वर येऊन थांबली आहे.

राज्यात लाचखोरीच्या 600 सापळे यावर्षी यशस्वी झाले. यातील तब्बल 150 सापळे पोलीस विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांविरुद्ध झाले आहेत. यात पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पोलीस विभागाखालोखाल महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकले. या विभागाशी संबंधित सापळ्यांची संख्या 146 इतकी आहे. त्यानंतर आरोग्य, नगरविकास, बांधकाम विभाग, ग्रामविकास या विभागातील सापळे देखील मोठे आहेत.

 

 

शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस बसस्थानकात लाच घेताना चतुर्भूज

बीड - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात पुढे कारवाई न करण्यासाठी सात हजारांची लाच घेणार्‍या बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी दुपारी बीड बस स्थानकातील पोलीस चौकीत ही कारवाई करण्यात आली.

चरणसिंग वळवी असे त्या लाचखोर पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. शिवाजीनगर ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. यामध्ये कारवाई न करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल वळवी याने लाच मागितली. तडजोडीअंती 7 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. याबाबत सबंधिताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने सापळा रचून बसस्थानकातील चौकीमध्ये वळवी यास लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधिक्षक राहूल खाडे, अपर अधिक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक बालकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविद्र परदेशी, पो.ना. श्रीराम गिराम, गोरे, गारदे, कोरडे आदिंनी केली.

 

बीड जिल्ह्यात ‘महसुल’ ची आघाडी

 

बीड जिल्ह्यात 2020 या वर्षात आजपर्यंत लाचखोरीच्या 20 प्रकार समोर आले. यातील 6 प्रकरणे महसूल विभागातील आहेत. यातील एका प्रकरणात तर तहसीलदार, तलाठी आणि कोतवालच अडकले आणि ते देखील भ्रष्टाचार विरोधी दिना दिवशीच. महसूलच्या सापळ्यामध्ये अडकलेल्यांमध्ये तलाठी सर्वाधिक आहेत. तर महसूल खालोखाल पोलीस विभागातील सापळ्यांची संख्या (रविवारच्या कारवाईसह ) 5 इतकी आहे. यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. यावर्षी बँकेशी संबंधित व्यक्ती देखील लाचेच्या सापळ्यात अडकल्या. यात जिल्हा बँकेचे कर्मचारी आणि एका सहकारी बँकेचे चेअरमन यांचाही समावेश राहिला.

 

Advertisement

Advertisement