अहमदनगर- येथील प्रसिद्ध असलेल्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलासाठी बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्ष बदलासाठी आज बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगरच्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. दरम्यान विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू असताना काही स्थानिक ग्रामस्थ यामध्ये पडले. परिणामी बाचाबाचीचं रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारीपर्यंत गेले. या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली आहे.
ग्रामस्थही झाले जखमी
हाणामारीमध्ये गावातील काही लोकांचा देखील सहभाग होता. यामुळे विश्वस्तांसह काही ग्रामस्थ देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.