सोलापूर - जिल्ह्यात एक खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. शेतीच्या वादावरून पुतण्याने चुलत्याचा कुऱ्हाडीने गळा कापला. तो एवढ्यावर न थांबता कुऱ्हाडीने मुंडके धडावेगळे केले. सावत्र चुलत्याची निर्घृण हत्या करून संशयीत आरोपी पुतणे हे मुंडके घेऊन फरार झाले होते. खुनाचा थरार माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शेवरे येथील कुरणवस्तीवर सोमवार दि. ११ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला आहे. संशयीत आरोपी मुंडके घेऊन फरार झाल्याने खळबळ उडाली होती.
सोमवारी दिवसभर टेंभुर्णी पोलीस मृत शरीराचे मुंडके शोधत होते. आरोपींनी घटनास्थळी पासून दहा किमी अंतरावर मक्याच्या शेतात मुंडके फेकून आरोपी फरार झाले होते. सायंकाळच्या सुमारास मुंडके मिळाले असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असून मंगळवारी अंतिम संस्कार केले जाणार आहे. खून करणाऱ्या आरोपींपैकी एकाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. आणखी संशयीत आरोपींचा शोध सुरू असल्याचे एपीआय जोग यांनी सांगितले आहे. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५) असे त्या मयताचे नाव आहे.