जालना- अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर २ साथीदारांसह आढळून आला.
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर.सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.