Advertisement

प्लॉटिंग व्यवसायात भूकंप

प्रजापत्र | Friday, 25/12/2020
बातमी शेअर करा

खाजगी व्यक्तींनी ढापलेल्या वक्फ जमिनीचे व्यवहार होणार रद्द

बीड   : राज्यभरात असलेल्या वक्फच्या जमिनी महसूल अधिकार्‍यांना हाताशी धरुन खालसा करण्याच्या नावावर भूमाफियांनी ढापल्या आहेत. वक्फच्या जमिनीचे हस्तांतरण करण्याचा अधिकार वक्फशिवाय इतर कोणालाच नसल्याचे सांगत आता असे सर्व व्यवहार रद्द करण्याचे आदेश अल्पसंख्यांक विकास 
व वक्फ मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे बीडसह राज्याच्या प्लॉटिंग व्यवसायात भूकंप होणार आहे. बीड शहर आणि जिल्ह्यातील अनेक मोक्याच्या जागा या वक्फची मालमत्ता असून त्या ठिकाणी भलत्याच 
लोकांनी प्लॉटिंग टाकलेली आहे. 
राज्यात वक्फची मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही निजामाच्या आमलाखाली असलेल्या भागात म्हणजे सध्याच्या मराठवाड्यात या मालमत्तांचे प्रमाण जास्त आहे. मात्र मधल्या काळात भूमाफियांनी या वक्फच्या मालमत्ता खालसा करुन घेण्याचा सपाटा लावला. महसूल विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन मदतमाश म्हणून असलेल्या जमिनी परस्पर खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आल्या.
            बीडमध्ये भू सुधार विभागाच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी अशा अनेक जमिनीचे आदेश खाजगी व्यक्तींच्या नावे काढले आहेत. या जमिनीवर आता अनेक ठिकाणी प्लॉटिंग झाली आहे. तर काही ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र वक्फची मालमत्ता इतरांच्या हक्कात हस्तांतरीत होत नाही. तसेच असे हस्तांतरण करण्याचा अधिकार महसुल अधिकार्‍यांना नाही अशी भूमिका आता राज्याच्या वक्फ मंत्र्यांनी घेतली आहे. केवळ वक्फच नव्हे तर इतर कोणत्याही देवस्थानची जमिन खाजगी व्यक्तींच्या हक्कात देता येत नाही, त्यांची नोंद फार तर इतर हक्कात घेतली जाऊ शकते. असे धोरण अनेकदा जाहीर करण्यात आलेले आहे. असे असताना बीडसह राज्यभरात वक्फच्या मालमत्तांचे हस्तांतरण झाले आहे. आता हे हस्तांतरण तातडीने रद्द करावे असे निर्देश वक्फ मंत्र्यांनी दिले आहेत. त्यानूसार राज्याच्या महसुल विभागाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना या निर्देशानूसार कारवाई करायला सांगितले आहे. 
वक्फच्या ढापलेल्या मालमत्तांचे व्यवहार रद्द करुन त्या पुन्हा वक्फच्या नावे केल्यास बीडच्या प्लॉटिंग व्यवसायात मोठा भूकंप होणार आहे. वक्फच्या मालमत्ता खालसा करुन त्यावर प्लॉटिंग करण्यात अनेक बड्या हस्ती सहभागी आहेत. आता त्या सर्वांसमोरच्याच अडचणी वाढणार आहेत.

भू-सुधारचे अधिकारी अडकणार
भूमाफियांनी वक्फच्या मालमत्तांचे जे हस्तांतरण केले आहे ते सर्व भू सुधार विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केले आहे. वक्फची मालमत्ता खिदमतमाश आणि मदतमाश या दोन स्वरुपात असते. भूसुधार विभागाकडे अर्ज करुन काही रकमेचा नजराना भरुन या जमिनी खालसा करण्यात आल्या. विशेष म्हणजे हे सर्व करताना भूसुधार विभागाच्या अधिकार्‍यांनी वक्फ विभागाची परवानगी देखील घेतली नाही. त्यामुळे आता हे सारेच अधिकारी अडचणीत येणार आहे. अजूनही अशा जमिनीच्या हस्तांतरणाची प्रकरणे बीडच्या उपजिल्हाधिकारी भूसुधार यांच्यासमोर आहेत. त्यांना या प्रकरणात निर्णय न घेण्याची समज द्यावी असेही शासनाने म्हटले असून अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

Advertisement

Advertisement