पंढरपूर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कार्तिकी पूजेचा मुद्दा चांगलाच रंगला होता. आता याच मुद्द्यावर मंदिर समिती आणि प्रशासन सोमवारी स्थानिक मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहे. कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्याबाबत शासन आणि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरु आहेत. या गोंधळाचा त्रास सर्वसामान्य वारकरी भक्तांना जाणवू नये याबाबतही प्रशासन खबरदारी घेत असले तरी आता शासनाच्या निर्णयानंतर कार्तिकीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार अजित पवार करणार की कोण करणार हे देखील लवकरच समोर येणार आहे.
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कोणत्याही आमदार,खासदार अथवा मंत्र्याला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिला होता. मात्र काल ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केल्यानंतर पुन्हा एकदा कार्तिकीची पूजा कोण करणार यावर चर्चेला सुरुवात झाली आहे. मंदिर समितीने मराठा आंदोलकांनी बैठकीच्यावेळी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण देणार नसून मराठा समाजाच्या भावना शासनाला कळवू अशी भूमिका घेतली होती.