Advertisement

जशास तसे उत्तर द्यावे लागेल

प्रजापत्र | Friday, 17/11/2023
बातमी शेअर करा

अंबड - आज महाराष्ट्रात ओबीसींचे शिरकाण होत आहे, पोलीस काय करतायत ? ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर ओबीसी शांत बसणार नाहीत. आम्हाला गावबंदी करणारे हे कोण ? हे लोकशाहीचे राज्य आहे की नाही, सरकार, कायदा आहे का नाही? आमचे बॅनर फाडणार असाल तर जशास तसे उत्तर द्यावे लागेल असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आता शांत बसणार नसल्याचा एल्गार केला. 

 

 

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण कायद्याने घ्या, दबाव टाकून नाही असे सांगत जरांगे यांच्यावर टीका केली. यांचा कोणताही अभ्यास नाही, मात्र सरकार यांचे लांगुलचालन करतेय असे सांगितले. आता कुणबी जातीच्या नोंदीचे देखील बनावट कागदपत्रे आणले जात आहेत, हेडमास्तरांकडून जबरदस्तीने लिहून घेतले जात आहेत, आम्ही हे खपवून घेणार नाही असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

 

आमच्या लोकांची राखरांगोळी करता, हे कोणते विचार असा सवाल देखील भुजबळ यांनी केला. तसेच आंतरवली सराटी येथे झालेल्या लाठीमाराबद्दल बोलले जाते, मात्र त्या ठिकाणी ७० पोलीस जखमी झाले, त्याचे काय? त्यात महिला पोलीस देखील होत्या, त्यांच्यावर दगड कोणी मारले? पोलिसांवर हल्ला करणे कोणत्या कायद्यात बसते? तरीही सरकारचे लोक माफी मागतात, अरे किती लांगुलचालन करणार? असा सवाल विचारत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला. ओबीसींना मिळालेले आरक्षण संविधानाने दिले आहे, ज्याला आरक्षण पाहिजे त्याने यावे, मागासवर्ग आयोगाकडून यावे, पण उपोषण आंदोलनाची धमकी देऊन आम्ही काही होऊ देणार नाही. आता ओबीसींची जनगणना होऊनच जाऊद्या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊद्या असे भुजबळ म्हणाले. तसेच आता जिल्ह्या जिल्ह्यात, तालुक्या तालुक्यात मेळावे घ्या. एकत्र या, संघर्ष करूच आणि वेळपडल्यास जशास तसे उत्तर देऊ असेही भुजबळ यांनी आवाहन केले. सभेला मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती. 

Advertisement

Advertisement