राजकारणात येण्याचा अधिकार प्रत्येकाला संविधानानेच दिलेला आहे. एखादा सामान्य माणूस असो व मोठा उद्योजक , अगदी निवृत्त झालेले सनदी अधिकारी, किंवा आणखी कोणी, राजकारणात यायची कोणाची इच्छा असेल आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्याची फारशी चर्चा करण्याचे काहीच कारण नसते. मात्र कालपर्यंत राजकारणाचा 'र' देखील नको म्हणणारे एखादे औद्योगिक घराणे जर अचानक सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असेल आणि या प्रवेशापूर्वी त्यांच्याबाबतीत काही केंद्रीय संस्था सक्रिय झालेल्या असतील तर हा पक्ष प्रवेश सहज आहे असे तर म्हणताच येणार नाही. त्यामुळे मग सत्ता काय काय घडवू शकते याच्या चर्चा तर होणारच.
सुरेश कुटे या नावाचा अभिमान वाटावा असे अनेक लोक केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहेत. बीड सारख्या जिल्ह्यातला एखादा व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्योगात उतरतो आणि केवळ गावात किंवा जिल्ह्यात, राज्यात नाही, तर देशपातळीवर आपल्या उद्योगाचे जाळे पसरवितो , याचे अप्रूप कोणालाही असणारच. हे सारे करताना, स्वतःला कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवत, प्रत्येकवेळी सामाजिक भान जपत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास झालेला असल्याने साहजिकच तिरुमला समूह काय, द कुटे ग्रुप काय किंवा सुरेश आणि अर्चना कुटे हे दाम्पत्य काय, ही नावे औद्योगिक विश्वात आदराने घेतली जायची. त्या सुरेश कुटे यांचा आज भाजपा प्रवेश झाला. खरेतर राजकारणात चांगल्या माणसांची आवश्यकता आहेच. राजकारण म्हणजे गटारगंगा असे केवळ म्हणून राजकारण स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी ज्यांना काही तरी चांगले व्हावे, समाजात बदल व्हावे असे वाटते, त्यांनी स्वतः राजकारणात उतरून त्या बदलांसाठी प्रयत्न करावेत हे कधीही उत्तम. त्या न्यायाने जर बीडच्या कुटे दाम्पत्याला राजकारणात येण्याची इच्छा झाली असेल आणि त्यांनी त्यासाठी भाजपचा पर्याय निवडला असेल तर त्याचे देखील स्वागत करायला काहीच हरकत नाही.
मात्र याच सुरेश कुटेंचा आजपर्यंतचा प्रवास, त्यांना अचानक राजकारणात येण्याची इच्छा झाली असेल यावर विश्वास ठेवू देत नाही. कायम राजकारणापासून चार हात दूर राहणारा, किंबहुना स्वतःच्या समुहामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असतानाही कधीच समोर न येणारा व्यक्ती म्हणूनच सुरेश कुटेंची ओळख आहे. आपण भले आणि आपला उद्योग भला, अशा मानसिकतेत व्यक्ती म्हणूनच जेव्हा थेट राजकारणात येतो, त्यावेळी आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच कुटेंच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत असले आणि त्यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवेशासाठी शुभेच्छा असल्या तरी ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसात घटना घडामोडी घडल्या, त्या पाहता हा राजकारण प्रवेश हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. कुटेंच्या उद्योग समूहाची आयकर खात्यामार्फत तपासणी होते काय, त्यामुळे त्यांच्या ज्ञानराधा परिवाराला अडचणींना सामोरे जावे लागते काय आणि त्यानंतर पहिल्या दिवशी आपण आपल्या उद्योग समूहातील मोठ्या प्रमाणावर समभाग विकले असल्याची घोषणा करीत दुसऱ्याच दिवशी कुटे कुटुंबासह भाजपवासी होतात काय .... या साऱ्या घटना निव्वळ योगायोग तर म्हणताच येणार नाही. आजपर्यंत भाजप प्रवेशाची जी मालिका होती, त्यातील बहुतांश प्रवेश ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा संस्थांची भीती दाखवूनच झाले आहेत हे तर उघड सत्य आहे.
पण आतापर्यंत जे प्रवेश झाले, ते किमान राजकारण्यांचे तरी होते, मात्र ज्यांना कुठलाच राजकीय वारा कधी शिवला नाही, अशा व्यक्तीच्या प्रवेशाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उताविळ असतात, याचा अर्थ काय घ्यायचा? भाजपला नेमकी कोणती भीती सतावत आहे, की कसेही करून जमेल त्याला पक्षात घेण्यासाठी 'चाणक्य' नीतीतील साम, दाम, दंड, भेदाचा प्रयोग सुरु आहे आणि उद्योगपती देखील त्याला अपवाद ठरायला तयार नसतील तर सत्ताकारण कोणत्या पातळीवर पोहचले आहे, राजकारण किती रसातळाला गेले आहे आणि भाजप कोणत्या पातळीवर उतरत आहे हे सारे शोचनीय आहे. यापुढे जाऊन भाजपामध्ये बीड जिल्हा हा तसा पंकजा मुंडेंचा जिल्हा, ओबीसी राजकारणाला प्राधान्य देणारा जिल्हा, त्या जिल्ह्यात अशा वातावरणात, पंकजा मुंडे किंवा स्थानिक भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नसताना, ओबीसी समुहा बाहरेच्या एका बड्या व्यक्तीचा होणारा प्रवेश हा पुन्हा वेगळ्या राजकारणासाठी तर नाहीना हा देखिल प्रश्न आहेच. असे अनेक प्रश्न सुरेश कुटे आणि कुटुंबाच्या राजकारण प्रवेशामुळे निर्माण झालेले आहेत.
आता भाजपवासी झाल्यानंतर उद्या कदाचित सुरेश कुटे आणि परिवार आपण कसे भाजपच्या विचारांनी प्रवृत्त झालो, आणि अंत्योदयाची संकल्पना कशी आवडली असे काही सांगून त्यांच्या राजकीय प्रवेशाचे समर्थन करतील देखिल, मात्र यामुळे जिल्हाभरात जी चर्चा प्रवेश करण्यापूर्वी व झाल्यावर होते आहे त्याचे काय?