मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काही भागांमध्ये आंदोलने केली गेली, तर काही भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. हे आंदोलन थांबलं मात्र, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत.हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने घरातच विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरूणाने सुसाइड नोटदेखील लिहून ठेवलेली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या सुरूच असल्याचं दिसून येत आहे. या 27 वर्षीय तरूणाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तो उच्चशिक्षित होता. त्याला नोकरी मिळत नसल्यामुळे तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला होता.
सुसाईड नोटमध्ये काय लिहलं?
एक मराठा लाख मराठा, मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.