Advertisement

बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण?

प्रजापत्र | Friday, 03/11/2023
बातमी शेअर करा

बीड- मराठा आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या बीडमधील जाळपोळी आणि दगडफेकीमध्ये आमदारांच्या घरावर लक्ष करण्यात आलं, मात्र यामागे एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण हे तपासा अशी मागणी ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. बीडच्या जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १२० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे या तपासामध्ये पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

 

हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागलेत. हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. १२० तरुणांमध्ये बहुतांश तरुण पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत.

जमावाचा उद्देश जीवाताला धोका पोहोचवण्याचा, जयदत्त क्षीरसागरांचा आरोप
बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि यावर जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याचे सांगत ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता असा देखील प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. 

Advertisement

Advertisement