बीड दि.८ (प्रतिनिधी)-गोपीनाथ मुंडे राज्याचे राजकारण करतानाही त्यांचे बीड जिल्ह्यावर कायम लक्ष्य असायचे आणि त्या प्रत्येकवेळी बारामतीवर टीका करताना ते नेहमी 'आईची माया दाईला कशी येईल' असे म्हणत प्रत्येक अडचणीत बीड जिल्ह्यात सामन्यांना आधार द्यायला उभे असायचे.आता त्यांचा राजकीय वारसा चालवत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे कोणावर टीकाटिपण्णी करत नाहीत,मात्र दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहण्यासाठी ३ दिवसापेक्षा अधिक वेळ त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देतात,सरकार कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास देतात हे पाहिल्यानंतर जिल्ह्याला पुन्हा गोपीनाथ मुंडे आठवत आहेत.
बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती काही नवीन नाहीत.दुष्काळ हा जणू काही जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलेला अशी परिस्थिती.हा दुष्काळ कधी कोरडा तर कधी ओला.कोरडा असेल तर शेतांची अवस्था ओसाड माळासारखी आणि ओला असेल तर शेतच खरडून जाणार.दार तीन-चार वर्षांनी कोणता ना कोणता दुष्काळ येथील शेतकरी आणि सामान्यांना नागवतोच.दुष्काळ असेल किंवा कोणतीही आपत्ती,आर्थिक मदत तर महत्वाची असतेच पण या काळात आपले नेते आपल्यापर्यंत धावून येतात हा आधार देखील फार महत्वाचा असतो.
ज्यावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात होते,त्यावेळी अशा प्रत्येक आपत्तीमध्ये ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर असायचे.बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंचे राजकारण बहरलेले असले तरी हा जिल्हा शरद पवारांच्या विचारांच्या मागे,म्हणजे बारामतीच्या राजकीय दिशेसोबत देखील असायचा.अशावेळी सामान्यांना आधार देण्यासाठी जाणारे गोपीनाथ मुंडे चेष्टेत 'आईची माया दाईला कशी येईल? ' असे म्हणायचे.या बीड जिल्ह्याने दुष्काळामुळे गावे ओस पडून छावणीचेच गाव झालेले आणि त्याच छावणीत मुक्काम करून शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे,ओल्या दुष्काळात गोदाकाठी गुढघ्यापर्यंत पाय फसत असताना देखील ती शेते तुडवत,कोठे वाळवंट वाटावे अशा शेतातून पायपीट करत शेतकऱ्यांच्या कॅम्पमध्येच त्यांच्यासोबत चार घास खाऊन गोदापरिक्रमा करणारे गोपीनाथ मुंडे पाहिले आणि अनुभवले आहेत.
आज बीड जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे,दाहकता भयानक म्हणावी अशी आहे.राजकीय परिस्थिती कमी अधिक फरकाने दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या काळात असायची तशीच आहे.मात्र पंकजा मुंडे मंत्री आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचाच सामाजिक विचार घेऊन त्यांनी दुष्काळी दौरा केला. केवळ महामार्गाभोवती न फिरता तब्बल तीन दिवस त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, ज्या गावांची कधी काली त्यांच्या गाड्या अडवविल्या होत्या,त्या भागात देखील सामान्यांच्या वेदना समजून घ्यायला त्या फिरल्या आणि जिल्ह्याला गोपीनाथ मुंडेंची पुन्हा आठवण झाली.

